"आनंदवन समाजभान अभियान." - महेश निंबाळकर


अगदी ३ महिन्यांपूर्वी काम कसं करायचं हा प्रश्न घेऊन "स्नेहग्राम" उभारणी वादळ मनात सुरु झालं होतं. एके दिवशी अचानक श्री. कौस्तुभदादा आमटे यांचा मॅसेज आला की, "मी पुण्यात आहे, भेटायला ये." 

मी दोन दिवसांत पुण्याला पोहोचलो. तिथं बरीचशी  चर्चा झाली. तसे "सृजन व्हिलेज" या व्हॉटअप ग्रुपमधून आजवरच्या गरजू व होतकरुंना उभारलेल्या मदतनिधी वा विविध संस्थांना साहित्य वाटप असो, हे सर्व कौस्तुभदादा अगदी जवळुन पहात होते. परंतु या सार्‍या गोष्टीत तुझ्या प्रकल्पाचे काय? त्याच्या स्थिती काय? तो कधी सुरु करायचा? हा गंभीर प्रश्न चर्चेतुन माझ्या पुढे उभारला. 

अगदी क्षणाचाही विलंब न करता कौस्तुभदादांनी माझ्या प्रश्नाची उकल केली- "आनंदवन समाजभान अभियान." आपण स्नेहग्रामला मुर्त्यरुप देऊयात, चर्चा झाली अन् अवघ्या ८-१० दिवसांनी कामास सुरुवातही झाली. दरम्यान कोरफळ्याच्या माळावर ना वीज ना पाणी अशी बिकट अवस्था त्यात उन्हाच्या तीव्र झळा. तरीही कसलाही विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. बोअर मारले त्यास पाणी लागले अन् पाया खोदून टीन शेडच्या उभारलीचे कामही सुरु झाले. दरम्यान सोमनाथ कँपला जाण्याचा योगही आला. तिथून अफलातून उर्जा घेऊन जोमानं कामाला लागलो. 

याच काळात महारोगी सेवा समितीचे विश्वस्त श्री. सुधाकर कडू गुरुजी, पल्लवीताई आमटे, श्री. विजुभाऊ जुमडे, अविनाश कुलसंगे, रश्मीताई आदी मंडळी येऊन गेली. २३ मे ला काम चालु झालं अन् शेवटच्या आठवड्यात पाऊसानं जोरदार बॅटिंग केली. कित्येकवेळा बार्शीला पावसात भिजत जायची वेळ आली. आडोसा तयार झाला नव्हता. माळावर सावलीला अन् सोबतीला हिवर तेवढं होतं. हळुहळु पाच टीन शेड उभारले. आता फरशीचं काम बाकी आहे. वीजेचा मोठा प्रश्न आवासून उभा आहे. त्यासाठी सौर कंदिलांचा आधार घेतोय तर पाणी उपसण्यासाठी जनरेटरचा शोधही चालु आहे. 

अखेर शाळेची घंटा वाजली..!

शाळा सुरु होऊन आठ दिवस उलटले, काम अर्थवट अवस्थेत होतं, तरीही धाडस करुन पालकांना निरोप दिले. आनंदाची बाब म्हणजे दोन दिवसांत १९ मुलं शाळेत आली. त्याचबरोबर आनंदवन समाजभान अभियानातून स्वराज माझदा अँब्युलन्स, होंडा युनिकार्न बाईक, लेनोव्हो लॅपटॉप, २ अॉफीस कपाट, धान्य कोट्या, टेबल, ४ लोखंडी बोर्डस्, पिठ गाळण्या, खुर्ची, ताट-वाट्यापासून जेवणासाठीची भांडी, सतरंजी, बँकेट, धान्य असे साहित्यही आले. एकाचवेळी दूहेरी आनंद झाला मुलं अन् साहित्य आल्याचा हा आनंद केवळ टीम आनंदवन समाजभान अभियानामुळे अर्थातच डॉ. विकासभाऊ आमटे, श्री. कौस्तुभदादा आमटे, पल्लवीताई आमटे यांच्यामुळे. गेल्या दोन दिवसांपासून विनया स्वत: मुलांना स्वयंपाक करुन जेवू घालतेय, रात्रीच्या मुक्कामाची जबाबदारी माझ्याकडे. त्यामुळे या कामास सेवाव्रती हातांची खरी गरज आहे. आपल्या ओळखीचे व कामाच्या शोधार्थ असणारे गरजु कुणी दांपत्य असेल तर आम्हाला जरुर कळवा. 
———————————————————
भविष्यात अनेक स्थलांतरीत व भटक्या समाजातील मुलांना कवेत घेण्याचा आमचा मानस आहे. वंचितांच्या आयुष्याला "प्रश्नचिन्ह" लागते तेव्हा "स्नेहग्राम" साकारते..!
———————————————————
महेश निंबाळकर
स्नेहग्राम, , 9405024613

Comments

Popular posts from this blog

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

Market Linkage after skill development - Mahesh Borge

WHAT WENT WRONG ???