'let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high...
कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर पोरखेळ होऊन बसतो आयुष्याचा. जपून तरी किती वागावं नेहमी? मग भीती तयार होते नात्यांत एक अदृश्य! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी झाडणार. किंवा सतत ही देखील टांगती तलवार राहते डोक्यावर, की आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे. ही भीती मोठाल्या भिंती उभ्या करते नात्यांत. आतून तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, तरीही आपण चिवटपणे तगून राहिलेलो असतो नात्यात, धरून असतो आपल्या माणसांना. (कारण आपल्याला आयुष्यातलं माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.) पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. असह्य होतात...