जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 3)
जोतिबाच्या गाभाऱ्यात मी शांतपणे बसून होतो. कुठे जायचे माहीत नाही, का आलोय माहिती नाही, कधी पर्यंत बसायचे माहीत नाही. बस, जोपर्यंत मन करते तोपर्यंत बसून राहायचे आणि मनाला वाटले की उठून जायचे. संसाराचे प्रश्न संताना सुटले नाहीत मग मी कोण बापडा.. आता जोतिबाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. सर्वांची गडबड चालली होती. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जोतिबाकडे गार्हाणे मांडून भाविक पुढच्या मार्गाला चालले होते. 8 च्या सुमारास गर्दी इतकी वाढली की मला नाईलाजास्तव उठावे लागले. इतक्या वेळात ना जोतिबाने मला काही सांगितले ना मी जोतिबाकडे काही मागितले. गुलालाने माखलेल्या पायऱ्या तुडवत तुडवत मी वर आलो. जोतिबाच्या डोंगरावर आता चांगलीच वर्दळ सुरू झाली होती. मी तसाच खाली आलो, यमाईच्या दर्शनाला कोणी आलेले दिसत नव्हते. यमाईचा शांत, निसर्गरम्य वातावरणात बस्स इथेच स्थायिक व्हावे असे वाटत होते. निसर्गाच्या सानिध्यात पिठाने भरलेल्या कट्ट्यावर निवांत बसलो होतो. बसल्या - बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. सुख नक्की काय असते ते मला इथे कळले. नुकतेच लग्न झालेल्या दांपत्याने मला झोपेतून ज...