भावना - अव्यक्त भावनांची कहाणी भाग - ०१

ढगांनी दाटी केलेली आणि काही केल्या काळोख हटायला तयार नव्हता. वास्तविक ज्यांच्यावर आयुष्याची डोर ठेवायची त्यांचीच इच्छा नव्हती कि मी जन्माला यावं. का कोणास ठावूक पण या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असतेच असते. मी जन्माला येण्यापुर्वीच माझ्या बापाला मला का जगात येवू द्यायचं नव्हत माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तसे पहिले तर माझा बाप काही साधासुधा नव्हता. कुशल नेतृत्व, उत्तम संवादकला, दिलखेचक वक्तृत्व यासोबत तंत्रज्ञानाची जोड यामुळे माझा बाप बऱ्याच भागातील शेतकरी वर्गाला माहिती होता. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार न करणारा माझा बाप इतका सामाजिक कसा झाला याचाही कधीतरी विचार करावा असे वाटते. 


जगातल्या काही प्रमुख बोटांवर मोजणाऱ्या शहरांपैकी एका शहरात माझा जन्म झाला. दिवसरात्र या मायानगरीत प्रत्येकजण नवीन स्वप्ने घेवून दाखल होत होते. लहान-थोर, अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, चाकरमाने, व्यापारी, व्यावसायिक, कलाकार यांनी गजबजलेल्या या शहरात कोणीही कमनशिबी रहात नव्हते मग मी तर येथेच जन्माला आलीय. घरातुन बाहेर पडले कि झगमगाटात चालणारी दिवसरात्र वाहनांची वर्दळ कधी कधी वैताग आणून सोडायची. जीवनवाहिनी, लोकल, ट्रेन असे कित्येक नावानी ओळखली जाणारी रेल्वे तर सर्वांच्या गळ्यातली ताईत होती. प्रत्येक मिनिटाला घरावरून जाणारी प्रचंड विमाने आणि त्यांच्या आवाजाने मनात धस्स व्हायचे... नेहमी वाटायचे आई विमानात बसेल आणि मला एकदातरी जन्मापुर्वी विमानात बसायचा अनुभव भेटेल.

माझा जन्म असला तरी माझ्या नशिबाची दोरी खुप अगोदर पासुन वेगळ्याच ठिकाणी बांधली गेली होती असे जन्मानंतर समजले. मुलाचे नशीब पाळण्यात ठरते असे मी जन्माला आल्यानंतर ऐकणार होते पण नाही, मी तर खुप अगोदरपासुन या जगात चर्चेत तर होतेच पण माझ्याबाबत नशीबही ठरत होते. बाबांच्या बाबांचे पुर्वीच देहावसान झाले होते त्यामुळे घरातील सर्व महत्वाचे निर्णय स्वतः बाबा घ्यायचे परंतु या चार - पाच महिन्यात मला समजले कि बाबा सर्व निर्णय घ्यायचे परंतु त्याचे श्रेय मात्र नेहमी दुसऱ्याला द्यायचे. कितीही भयानक आणि कठीण परिस्थितीत देखील शांत आणि संयमाने समाधान द्यायचे. बाबाच्या बोलण्यात नेहमी "ते श्रीकृष्णाचा अवतार आहेत" असे यायचे. हे ऐकुन मला बाबांचा तिरस्कार वाटायचा. बाबांचे असे बोलणे कधीच कोणाला समजले नाही. मला तर बाबा समजायचा प्रश्नच नाही कारण अजून मी या जगात प्रवेशच केला नव्हता. 

इतक्या मोठ्या खंडप्राय भारतात मुलींचे आयुष्य, त्यांचे राहणीमान, अडचणी आणि कित्येक गोष्टी अगोदरपासुनच माझ्या कानावर होत्या. माझे बाबा या न त्या कारणाने माझ्या आईला काहीतरी तत्वज्ञान झाडायचे. माझ्या बाबांचे आणि आईचे कधीच पटले नाही. आई आणि मी आम्हा दोघींचाही जन्म याच मायानगरीतला.... बाबांचा जन्म गावाकडचा, पण आई एकदम गावाकडची भोळी वाटते आणि बाबा एकदम पोहचलेले खिलाडी. आता तुम्ही म्हणाल कि प्रत्येक मुलीला आपल्या बापाचे कौतुक असणारच. तर वास्तवात माझे बाबा खुप वेगळे व्यक्तिमत्व होते. पण माझ्या बाबांचे आईने ऐकले कि नाही माहित नाही पण माझ्या कानावर नेहमी या गोष्टींचे बोल आणि अनुभव पडत होते. माझे भाग्य पण त्यांच्यासारखेच किंवा त्यांच्यापैकी असणार आहे हे पण समजत होते. 

ऑगस्ट महिन्यात भारतीय स्वतंत्र दिन झाल्यावर ३ दिवसांनी मी पण स्वतंत्र होऊन मी या गजबजलेल्या दुनियेत दाखल झाले. जन्माला आले तेंव्हापासून कानावर पडत होते की माझे बाबा मला सोडून गेलेत. का गेले? कुठे गेले? कसे गेले?  किती तरी प्रश्न मला खुप त्रास देऊ लागले. आजुबाजूच्या गर्दीत मला कुठेच माझे बाबा दिसत नव्हते. माझी आई माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हती. ती स्वतःच इतकी गोंधळलेली होती कि मलाच समजत नव्हते कि नक्की काय झालेय. आजा, आजी, मामा सर्वजन होते. कोण बाबाला शिव्या घालत होते. कोण माझ्या सौंदर्यावर, रूपावर चर्चा करत होते. मी आणि माझी आई मात्र बाबाला शोधत होती. एक दिवस, दोन दिवस, महिना झाला... काही केल्या बाबाचा पत्ता नव्हता. 

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???