एकच प्याला

*प्रिय हबी*

उद्या तुझा अकाली मृत्यू झाला तर आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याच्या सुखाला तू कायमचा मुकणार.
इतक्याने तुझ्या मृत्युचे परिणाम संपणार नाहीत तर तुझ्यामुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी होणार. मी तुझी बायको, मुकणार या सुखाला अन् पती सुखालाही... 



किती क्षणिक सुखाचं कारण पाहिलेस? तू खोट्या आनंदात रममाण झालास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नाही. आपले लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्या गराड्यात cheers करत आहेस. आता तर मित्र नसले तरी किंवा काही कारण नसले तरी तुला घ्यावी लागतेच, पण आपल्या मागे कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला आहे.

शिवाय रोज रात्री बाटलीभर घेऊन घरी येणे, दंगा करणे त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नाहीस. आपल्याला बाबा नाहीत याची त्यांना जणू सवय लागली आहे, पण तुझी भीतीही वाटत आहे. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले आहे. आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांना काय हवे, काय नको, याची तुला परवाच नाही. तू आणि तुझे आयुष्य.

दारूमुळे आपल्यातला दुरावा वाढलेला तुला कधी समजलाच नाही किंवा समजून घेण्याची तुझी कधी इच्छाच नाही. जर *हि बाटली एवढा आनंद देणारी, औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी तुझ्यासोबत घेतली तर तुला चालेल का?*

अमावस्या-पौर्णिमेच्या भरती-ओहोटी प्रमाणे अधूनमधून तुला येणारे प्रेमाचे भरते आणि तुझी दारू सोडण्याची केविलवाणी धडपड.... दारू सोडायचे ठरवायचास ते फक्त पिलेली उतरेपर्यंत.   कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही परत बसायचा, कि मग पुन्हा सर्व जैसे थे..

जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु तुम्ही मात्र वाईट मार्गच निवडला. तुमची दारू पिणं आणि तुमचे मित्र कधी सोडून बघितलं असतं तर मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याच्या सुखाला कवटाळले असते.

आता तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिवरची सूज उतरवायला औषधे घेणे, हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जाणार नाही.

तुझ्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार किंवा नाही, काही माहित नसताना तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबला नाही....
सरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे. कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसूलाकडेच लक्ष आहे. पण तुझी काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसणार नाही. शिवाय नवरा/मुलगा/वडील गमावणे याची किंमत पैश्यात कशी मोजणार??

तुझ्या आई वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या *‘एकच प्याला’* पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

*तुझीच प्रिय स्वीटू*
(वाचकांना विनंती आहे की पत्र वाचून खाली अभिप्राय द्यावा. तुमचे अभिप्राय सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध केले जातील. - महेश बोरगे)

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???