व्यवसाय, भांडवल आणि तरुणाई - महेश बोरगे
फरशी, फर्निचर, गाडी, मिठाई.... जवळपास सर्वच ठिकाणी स्थानिक तरुण वर्ग दिसत नाही. जो दिसतो तो परप्रांतीय... अशीच अवस्था प्रत्येक प्रांतात दिसते. उत्तर भारत असो वा दक्षिण भारत असो..., पूर्वोत्तर असो वा पश्चिम भारतीय... सर्वच ठिकाणी स्थानिक तरुण पिढी वाया जाताना दिसत आहे.
देशातील अग्रेसर राज्य आणि त्याची राजधानी मुंबईचे चित्र पाहिल्यास समजून घेणे सोपे जाईल. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम चालूच असते. कधी कधी तरी दिवस- रात्र काम सुरू असते. एक छोट्या कारखान्याप्रमाणे नियोजनबद्ध काम सुरू असते. मुकादम, कुशल आणि अकुशल अश्यारितीने विभागणी केलेली दिसून येते. हे फक्त त्याच तरुणांच्या ग्रुपमध्ये दिसते जे तरुण बाहेरील आहेत.
बांधकाम क्षेत्रात सगळे सूतार हे उत्तर भारतीय/ राजस्थानी आहेत. शिवाय सर्वजण उत्तम फर्निचर बनवतात. वाहतूक क्षेत्रात ड्रायव्हर, क्लिनर, मेकॅनिक, टायर दुरुस्ती सर्वच उत्तम काम करतात. जवळपास सर्वच क्षेत्रात हीच अवस्था आहे.
या सगळ्यांचा जो म्होरक्या असतो तो तरूण तिशीतला मुलगा असतो. सुरुवातीला अगदी हमालाचे काम सुरू करून ऑपरेशनमधील सर्व माहिती स्वतः शिकलेला दिसतो. साधारणपणे 5 ते 7 वर्ष प्रत्यक्ष मजुरी करून संबंधित व्यवसायातील छोटे-मोठे सर्व दुवे शोधून घेतलेले असतात.
प्रत्येक कामातील बारकावे, त्यातील धोके, आवश्यक कौशल्ये, आवश्यकतेनुसार इतर आधारित उद्योग आणि त्यातील ठोकताळे याचा अंदाज बांधलेला हा तरुण पुढे जाऊन गावातील निवडक अकुशल पण कामाची निकड / गरज असलेला इतर तरुण वर्गाला शोधतो आणि गरजेनुसार निरनिराळ्या व्यवसायांमध्ये आवश्यक ठिकाणी हाताखाली घेऊन त्यांना व्यावसायिक बारकावे, त्यातील धोके, आवश्यक कौशल्ये, आवश्यकतेनुसार इतर आधारित उद्योग आणि त्यातील ठोकताळे यांची प्रत्यक्ष कामातून अनुभव देत अकुशल तरुणांना उत्तम कुशल कारागीर बनवतो. ही प्रक्रिया अखंड सुरू राहते. या प्रक्रियेतून गेलेले तरुण कमी वेळेत यशस्वी होतात.
अगदी याउलट गावातील तरुणांची अवस्था असते. गावामध्ये शिल्लक राहिलेल्या तरुणांमध्ये प्रामुख्याने गरजू, कष्टाळू, नम्र, सहनशील, मितभाषी हे गुण नसतात. शाळेत घेतलेले शिक्षण आणि समाजात वावरताना आवश्यक असलेले शिक्षण यामध्ये असणारी तफावत याला कारणीभूत आहे.
शैक्षणिक पद्धतीवर स्वतंत्र पुस्तक लिहता येईल पण याठिकाणी आपण इतकेच पाहुयात की गावात राहणाऱ्या खासकरुन चौकातील तरुणांची अवस्था ही "विहिरीतील बेडकासारखी" असते. बेडकाला स्वतःवर इतका फाजील आत्मविश्वास असतो की तो स्वतः आकाराने बैलाइतके मोठे होण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावून बसतो.
तरुणांनी स्वतःकडे असलेले किमान शिक्षण, सभोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती, सहजरीत्या उपलब्ध होणारी नैसर्गिक संसाधने, पारंपरिक व्यवसायांना तंत्रज्ञानाची जोड, स्थानिक पातळीवर उपलब्ध मानवनिर्मित संसाधने आणि नव्याने उदयास आलेले कौशल्यावर आधारित सेवा - सुविधा या सर्व बाबींची पाहणी करावी. जेणेकरून कोणत्याही गुंतवणुकीशिवाय किमान स्वयंरोजगार सुरू करता येईल. यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न तरुणांना इतरांच्या दृष्टीक्षेपात येण्यासाठी उपयोगी ठरतील. जेणेकरून भविष्यात व्यावसायिक मदतीसाठी असेच भागीदारीसाठी अनेक मदतीचे हात समोर येतील.
यशस्वी व्यवसायिकांमध्ये कोणीही फार मोठी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे असे दिसत नाही. प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाने सुरुवातीला कौशल्यावर आधारित किंवा अनुभवाच्या आधारे स्वयंरोजगार सुरू केलेला असतो, जो नंतर टप्प्याटप्प्याने मोठा होत जातो. प्रत्येक व्यवसाय स्वयंरोजगार - कुटिरोद्योग- सुक्ष्म लघुउद्योग- लघुउद्योग- कारखाना या व अश्या टप्प्यातून जातो.
सर्वांचा एकमेकांवर अखंड विश्वास असतो. जे होईल ते चांगले होईल आणि ज्यांना गरज भासेल त्यांना सर्वांनी मदत करायची हा साधा आणि सोपा फंडा वापरलेला असतो.
एक विशीतला तरुण, काही दिवस रोजगार करतो. सर्व कौशल्ये आत्मसात करतो. तो आपल्या गावातून गरजू कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. मोठ्या कारागीरांच्या हाताखाली पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात.
मी राहतो त्या भागात नजरेसमोर समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते. उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे ....सगळे भाजीच्या दुकानात काम करतात. या दुकान गाळ्यावर आता या 10-12 वर्ष्यात हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत .....
फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग, किराणा, वडापाव गाडा, इस्त्रीवाला, दूधवाला, ब्रेडवाला, पानवाला, हजाम असे कित्येक व्यावसायिक आहेत जे 5 ते 10 हजाराच्या भांडवलात व्यवसाय सुरू करून 10 वर्ष्याच्या काळात कष्ट करून आता शेठ म्हणून वावरत आहेत. प्रत्येकाकडे SUV आहे, स्वतःचा बंगला आहे. घरी- दारी 4 ते 5 कामगार आहेत. याशिवाय आयुष्यात इतर काही अपेक्षित आहे असे मला वाटत नाही.
मी जेव्हा जेव्हा गावात मुलांना 25 - 30 वर्ष्याच्या तरूणांना पहिल्यांदा पाहतो तेंव्हा तेंव्हा त्यांचे संभाषण आणि नियोजन पाहून असे वाटते की या मुलांना भारतीय नियोजन आयोगामध्ये भरती करावे. पण जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटीनंतर ही मुले फक्त नियोजनाच्या गोष्टी करतात आणि मोठ्या भांडवलाच्या प्रतीक्षेत काहीच न करताना दिसतात तेंव्हा भ्रमनिरास होतो.
सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. इतर सर्व बाबी या सहाय्यक असतात. जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल व्यावसायिक बारकावे, त्यातील धोके, आवश्यक कौशल्ये, आवश्यकतेनुसार इतर आधारित उद्योग आणि त्यातील ठोकताळे यांची प्रत्यक्ष कामातून अनुभव घेतला तर तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.
Khup chan ahe tuzi lekhani
ReplyDelete