वांझ .... लेखिका सुहासिनी
लग्नाला चाळीस वर्षे झाली होती. पण आज तिने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रु पाहिले होते. तो हळव्या स्वरात तिला सांगु लागला, "आयुष्यभर कष्ट करुन, घाम गाळून, जे घर उभे केले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला, ते घर सोडून येतांना काही नाही वाटले, त्या घराचा उंबरठा नेहमीसाठी सोडून येतांनाही काहीच नाही वाटले गं..!
पण... पण... वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना *वांझ* असल्यासारखे वाटले..."
ती त्याच्याकडे खिन्न नजरेने बघतच राहिली. पापणी न हालवता. त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला... "सुनिता, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना गं?"
तिने बस् होकारार्थी मान हालवली... (मनात उदासीनता होती थोडी त्याच्या आणि थोडी तिच्याही)
त्याने पुन्हा विचारले, "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं?"
हे वय राहिले नव्हते कष्ट करण्याचे पण, त्याला पुन्हा शुन्यातुन विश्व निर्माण करायचे होते. स्वाभिमान दूखावला गेला होता त्याचा.
त्याच्या खांद्यावर डोके हलकेच टेकत, त्याला सावरत, "हो" म्हणाली ती.
उद्याचा दिवस वेगळा असेल...
*वांझ*. घरात वाद सुरु होता. वैभव व सुनिता दमले होते पण तुषार बोलतच होता, "बाबा तुम्ही मला शिकवले, माझे उत्कृष्टरीत्या संगोपन केले, मान्य! पण ते तुमचे कर्तव्यच होते.
तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यामागे तुमचा स्वार्थ होता. मी मोठा होईन, तुम्हाचा सांभाळ करेन हा स्वार्थ होता. पण मी तुमची वृद्धाश्रमात रहाण्याची सोय केली. महिन्यातुन एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन...
मला याचा काहीच फायदा नाही. आणि हो, म्हणूनच ते माझे कर्तव्य ही नाही. पण, ह्या वयात मी तुम्हाला माझ्या घरातुन बाहेर काढले तर. मला काळजी आहे समाज काय बोलेल ह्या पेक्षा, तुम्ही काय खाल, कसे राहाल, कोठे वास्तव्य कराल? ह्या सर्व गोष्टींचा विचार करुनच मी हा निर्णय घेतला आहे.
उगाच महिन्यातुन, पंधरा दिवसातुन होणारी वादावादी तरी टाळली जाईल, आणि अजयला हे नाही आवडत. आणि अमर पण आता मोठा होतोय. त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांच्या साखळीत अडकून रहाण्याने वाईट परिणाम होईल.
आणि आम्हाला ही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची. मग तुम्ही विरोध करणार. मग वाद होतात...
नको हे आता, बस्स करुया... तुमची अडचण होते आम्हाला. तुम्हाला निघायला हवं. आमच्याकडे बघुन नाही, पण अमर कडे बघुन तरी..."
हे एका दमात बोलला तुषार सारे काही. पण वैभव आणि सुनिताचा मात्र श्वास कोंडला होता.
त्या रात्री दोघेही जेवले नाहीत. झोप ही नाही लागली त्यांना. बॅग पॅक करुन ते बस्स अंधाराकडे घाबरुन बघत होते. पण अंधारातुन कधीतरी पहाट होणारच ना...!
तो उजेड कधी येऊच नये... अंधार असाच रहावा... आपले घर सुटू नये असेच वाटत होते वैभव आणि सुनिताला.
पण उजेड झाला... वृद्धाश्रम ही पाहिले. वृद्धाश्रमा पर्यंत सोबत तुषार ही आला होता. वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात तुषार म्हणाला, "बरं आई बाबा, आजपासून घरी फोन करत जाऊ नका. नाहीतर अमरला तुमची सारखी आठवण येत राहील. लहान आहे तो अजून. आणि अजयला ही हे आवडणार नाही...
आणि घरी यायचा हट्ट नका करु. मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नविन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन."
बस्स् इतकंच बोलला तुषार जाता जाता. वैभव आणि सुनिता मात्र काहीच बोलले नाहीत, ते बस्स बघत राहिले त्याच्याकडे. डोळ्यात आसवे इतकी दाटली होती की तुषार पाठ फिरवुन कधी निघून गेला हे ही समजले नाही...
एक प्रश्न मनात थैमान घालत होता. मुले जन्माला का घालतो आपण...? पालकांनी जे त्यांच्यासाठी कले ते *'कर्तव्य'* पण तेच जर पाल्यांनी पालकांसाठी केले तर ते *'उपकार'?*
झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरे, मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही. थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते. पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊन ही तसेच खंबीरपणे उभे असते...
दोघांचे ही हृदय गेले आठ दिवस खुप जड वाटत होते. गेल्या आठ दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले होते की आपण शरिराने म्हातारे झालोय. पण वैभव आणि सुनिताने आशा सोडली नव्हती...!
त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. वृद्धाश्रमातुन बाहेर पडताना खुप मोकळे मोकळे वाटत होते दोघांनाही. पण वैभव ने खुप चांगली माणसे जोडली होती.
तरुण असतांना जणू तो हरीश्चंद्रच होता. सुनिता मात्र सारखी भांडायची. तो दानशूरपणा नव्हता आवडत तीला. पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली. बस् आता निघायचे बाकी होते.
निघण्याआधी तुषारला फोन केला. हळूवार आवाजात वैभव बोलू लागला, "हॅलो तुषार बेटा, मी बोलतोय"
पलिकडून तुषार म्हणाला, "हो बाबा, बोला लवकर. कामं आहेत खुप इकडे."
वैभवने बोलायला सुरुवात केली, *"बाळ, तु म्हणालास की मी तुझ्यासाठी जे केले ते माझे कर्तव्य होते. पण तु जे माझ्यासाठी करतोस ते उपकार. बेटा तुला असे का वाटते की तु आहेस म्हणून मी आहे. बाबा होतो तुझा. मी आहे म्हणून तु आहेस. आणि हो, आजपासून तु वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भिक म्हणून जे पैसे पाठवतोस ते नको पाठवू आजपासून. आम्ही वृद्धाश्रम सोडून चाललोय. आम्ही मान्य केलेय, आम्ही वांझ आहोत. आम्हाला कोणी मुलगा नाही. जमले तर तुही तुझ्या नावातुन माझे नाव आणि आडनाव काढून टाक."* इतकेच बोलुन त्याने फोन ठेवला... एक नजर सुनिताकडे पाहिले. नाराज होती पण नवऱ्याचा आज जास्तच आभिमान वाटत होता.
दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले नव्या भविष्यात. पण मागे सोडून गेले एका शब्दात असणारा प्रश्न... उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला... तो
*वांझ!*
*©लेखिका- सुहासिनी.*
Comments
Post a Comment