भ्रांत न पडे मजला....
*मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!*
@doctorforbeggars
हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... !
वय साधारण 35, सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...!
एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची.
औषधं देता देता ... चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली !
दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ? जर तीचा असेल, तर याचे वडिल कुठं आहेत ? याला वडिल असतील, तर मग हि एकटीच कशी दिसते ?
एकेदिवशी मी विचारलंच... !
.... लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही... पुर्णतः निराधार.
जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं, हा रोजचा दिनक्रम !
रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात.
मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात !
अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला... पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... !
या झटापटीत एक मुल हिच्या पदरात पडलं... !
एकटीची जगायची भ्रांत, त्यात अजुन एकाची भर पडली.
ठिक आहे, जगात आपलं असं कुणीच नव्हतं, आता आपलं म्हणावं, असं आपलं मुल तरी आपल्याबरोबर आहे, आधार होईल भविष्यात जगण्याचा या सकारात्मक विचारानं तीनं आईपण जपलं... मुलाला जमेल तसं ती त्याला वाढवत गेली !
आणि याचवेळी मला ती भेटली होती.... तीनेक वर्षांपुर्वी !
'काम का नाही करत गं ?' मी तीला तेव्हा विचारायचो.
ती फक्त मान डोलवत गुढ हसायची.
वेगवेगळे व्यवसाय मी तीला सुचवायचो... मदत करतो असं म्हणायचो... पण ती ऐकल्यासारखं करायची... आणि पोराला हाताला धरुन दुर जायची !
उदास होवुन शुन्यात बघत रहायची !
बरोबर आहे, इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तीनं माझ्यावर तरी का विश्वास ठेवावा ?
भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटी पचत नाही हेच खरं !
गाण्यातले सुर हरवतात तेव्हा ते गाणं बेसुर होतं... आणि जगण्यातला नुर हरवला की ते जगणं भेसुर होतं... !
असं सर्वच हरवलेलं ती...!
एकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळुन घेणारा, मनासारखा कुणीतरी जोडीदार मिळाला, म्हणजे ती डिप्रेशन मधुन बाहेर येईल असं मला डाॕक्टर म्हणुन सारखं वाटायचं.
डिप्रेशन च्या पेशंटला औषध न लगे... !
औषध "नल" गे तीजला !
औषध फक्त त्या पेशंटचा हक्काचा "नल" !
अत्याचार झालेल्या, भीक मागणा-या मुलीला तीच्या मुलासह कोण स्विकारणार ? हा मोठा प्रश्न होता. तीला हा हक्काचा "नल" कधी सापडणार.... ? कसा ?
दिवसांवर दिवस जात होते. अशात मला एक तरुण भेटला. चुणचुणीत आणि गोड बोलणारा.
यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या, ढोलासारख्या !
थपडा मारुनही ढोल नाद निर्माण करतो.... !
हा सुद्धा त्या ढोलासारखाच !
थपडा खावुनही बोलणं आणि वागणं अतिशय नम्र आणि गोड, एक नाद निर्माण करणारं !
आपल्या शब्दांत नम्रता आणि गोडवा असेल तर शब्दांना वजन प्राप्त होतं.
शब्दांतली नम्रता आणि गोडवा हरवला की याच शब्दांचा स्वतःला भार होतो आणि दुस-याला ओझं !
असो, तर, यालाही मी काम करण्यासाठी विनवलं...!
याला भीक मागायचीच नव्हती... कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात... व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती याच्यात, पण संधी मिळत नव्हती !
मी हात देतोय म्हटल्यावर, झट्दिशी त्याने तो पकडला. व्यवसाय सुरु केला... आणि बघता बघता छान चालायलाही लागला... !
अतिशय प्रामाणिक आणि मनमिळावु असलेला हा मुलगा मला आवडायचा.
एकदा गंमतीने याला म्हटलं... 'काय मालक ? आता लग्न करा की राव ...!'
'करु की सर, तुम्ही बघा मुलगी... सांगाल त्या मुलीशी लग्न करतो...' तो म्हणाला होता.
हसुन हा विषय तिथं संपला खरा...
पण "सांगाल त्या मुलीशी लग्न करतो..." या त्याच्या वाक्यानं मला रात्र रात्र झोप यायची नाही...!
एकदा मनाचा हिय्या करुन याला "ती" ची सर्व परिस्थिती सांगितली.
हात जोडुन म्हणालो... करशील का रे लग्न तीच्याशी ?
क्षणभर विचार करत, माझ्या नजरेला नजर भिडवुन म्हणाला, 'माझ्यासारख्या भीक मागणा-याला तुम्ही हात देवुन बाहेर काढलंत सर, मी रोज विचार करायचो की या डाॕक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची ?'
'उभं असलेल्या माणसाला पाडायला फार ताकद लागत नाही, पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते, हे मी तुमच्याकडनं शिकलो सर...'
'तुम्ही मला तेव्हा उठवलंत... आता पडलेल्या कुणालातरी उठवायची पाळी माझी आहे... तुम्ही जे माझ्यासाठी तेव्हा केलंत, आज ते मी पुन्हा करणार तुमच्यासाठी ...!'
माझ्या डोळ्यात पाणी ठरेना!
तो तीच्याशी लग्नाला तयार झाला या पेक्षाही आपण सावरल्यावर, दुस-याला हात द्यायचा असतो, हे तो शिकला यात मला जास्त आनंद होता...!
माझ्यापेक्षा लहान आहे तो... पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले...!
पाय तरी कसं म्हणु ?
चरण म्हणणंच जास्त योग्य !
भरकटतं ते पाऊल, घसरतात ते पाय... आणि दिशा दाखवतात ते चरण... !
अत्याचारीत मुलीला तीच्या मुलासह स्विकारण्याची तयारी आणि तीच्या मुलाला आपलं नाव देवुन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणा-या त्या तरुणाचे पाय मला जणु चरणच भासले... !
यानंतर दोघांची भेट घडवुन आणली !
दोघांनी एकमेकांना समजुन घेवुन, पुर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली.
एकेदिवशी दोघांनी हसत हसत येवुन निर्णय दिला... आम्ही दोघेही स्वखुशीनं लग्नाला तयार आहोत... !
तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणा-या वधुपित्याची काय गत होत असेल हे मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं !
आयुष्याच्या या नाटकात यावेळी सगळ्याच भुमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक मी खरोखर जगलो...!
मीच पुरोहीत होवुन कधी लग्नाची तारीख काढली... तर मीच माझ्याशी बैठक घेवुन दोन्ही बाजुची यादीही केली ..!
मुलाची बहिण होवुन मीच माझ्याशी भांडलो... तर मुलीची आई होवुन स्वतःशीच उगीच रडलो...!
या लग्नात मी वरातही झालो... आणि वरातीची म्हातारी घोडीही झालो...!
मुंडावळ्या बनुन कधी कपाळावर झळकलो तर पायताण बनुन पायातही सरकलो... !
भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजुत काढुन पुन्हा खोटंखोटं हसलो ... !
आणि त्याच्याबरोबर जातांना, ज्या क्षणी दादा म्हणत मला तीनं गळामिठी मारली त्याक्षणी त्या मी तीचा बापच झालो... !
आज या लग्नाला दोन वर्षे झाली.
दोघंही आनंदात आहेत, तीच्या अगोदर असलेल्या मुलासह !
या मुलाचं मला कौतुक वाटतं... आपल्या आईच्या लग्नाला तो हजर होता...!
कळता झाल्यावर लोक त्याला टोचुन बोलतील का... ? सध्या माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही !
असो !
जमिनीवर पडते ती सावली... ! हि सावली कुणाला आधार देते तेव्हाच ती छाया होते !!!
हे दोघेही एकमेकांना आधार देत, मुलाची छाया बनले आहेत. बीनबापाच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं आहे, ख-या अर्थानं तो बाप झाला आहे...!
बेसुर आणि भेसुर आयुष्य आता संगीत झालंय !
संगीत ऐकायला दरवेळी त्यातलं काही कळावंच लागतं असं नाही... मैफिल जमली की गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते... ती ऐकु आली म्हणजे झालं... !
पहिली दाद या झंकाराला दिली...की कागदावरचे शब्द मोहरुन कविता होतात... !
या कवितेत गाणा-याचा आणि ऐकणा-याचा भाव एकरुप झाला की त्याचं भावगीत तयार होतं... !
या दोघांच्या या गाण्याला दाद देणारा मी फक्त रसिक !!!
आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे...
"ती" अजुन एकदा आई होणार आहे हे मला "त्या"ने जानेवारी 2020 मध्ये सांगितलं. म्हणाला सर आत्ता चौथा महिना सुरु आहे तीला...
'होय बाबा, आता सगळे कामधंदे सोडुन दुपटी शिवत बसतो मी ...' माझ्या या बोलण्यावर "तो" लाजला होता.
यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वैगेरे आटोपुन 19 जानेवारी 2020 ला ती प्रसुत झाली. मुलगा झाला !
"त्या"ला आणि "ती"ला भेटायला आज 20 जुन ला मी पेढे घेवुन गेलो.
दोघांच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता.
लाॕकडाउन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे, भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा टिकाव लागणार ?
पण हरकत नाही, ये भी सही !
चालतांना कधीतरी काटेही टोचलेलं बरं असतं, म्हणजे माणुस त्याच जागी रेंगाळत नाही... काटे बोचायला लागले की, ती जागा सोडण्यासाठी का होईना, पण चालणाराचा वेग वाढतो... !
तो, नको नको म्हणत असतांना, त्याच्या खिशात साडेचार हजार रुपये कोंबले.
तो म्हणाला, 'सर, हाॕस्पिटलची बिलं, औषधांचा खर्च आणि बाकीचंही सगळं तुम्हीच करताय, वर अजुन हे पैसे कशाला... ?'
'पहिली डिलीव्हरी माहेरीच असते बाबा, पोरीच्या बापालाच करावं लागतंय सगळं...' मी खळखळुन हसत म्हणालो...
मी हसत होतो आणि मागं मला तीच्या हुंदक्यांचा आवाज जाणवत होता ... !
ती नाहीच बोलली काही... पण तीचे डोळे बोलायचे थांबत नव्हते... !
मी बाळाकडे पाहिलं... इतकं देखणं बाळ... !
कमळ चिखलात उगवतं हेच खरं... !
'तुझ्यासारखंच आहे गं बाळ' मी म्हटलं.
पालथ्या मुठीनं डोळे पुसुन ती हसायला लागली... !
कोणत्याही रडणा-या आईजवळ जावुन बाळाचं कौतुक करावं, स्सेम तुझ्यावरच गेलंय बघ म्हणावं... ती हसणारच !
कारण वजन फुलांचं होत असतं, सुगंधाचं नाही...!
एखाद्या आईच्या ममतेचं वजन कसं करणार ?
ते ही या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच !
"बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय ?" निरोप घेत मी उठत सहजच विचारलं.
अगदी सहज आवाजात ती म्हणाली, 'हो ठरवलंय ना ! अभिजीत नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं ... !'
'क्काय ... ?' खुप जोरात मी हे वाक्य ओरडुन बोललो असेन. कारण दवाखान्यातल्या अनेकांनी चमकुन पाहिलं माझ्याकडं !
जीभ चावत, हळु आवाजात म्हटलं...,'का गं ? अभिजीत का ?'
म्हणाली, 'दादा, मला ना आई, ना बाप, ना भाऊ ना बहिण...पण तुम्ही माझी आई, बाप, भाऊ आणि बहिण होवुन ती उणिव भरुन काढली !
आज माझ्या मुलाचं नाव मी जर अभिजीत ठेवलं तर मला त्याला सतत जाणिव करुन देता येईल...
कितीही मोठा झालास तरी कधीतरी, तान्हं बाळ होवुन, मुल नसलेल्या आईचं मुल हो....
अनाथ एखाद्या बहिणीचा भाऊ हो...
रस्त्यांत तळमळत पडलेल्या पोराची कधीमधी आई हो...
आणि माझ्यासारख्या रस्त्यांवर पडलेल्या एखाद्या पोरीचा आयुष्यात कधीतरी बाप हो...
मी शिकवीन त्याला...
पुढचं तीला बोलता येईना...
आणि मलाही ऐकु येईना....
जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता... !
माझा सन्मान होता !
दवाखान्यातुन मी निघालो... तर "तो" आडवा आला, म्हणाला, 'सर, ठेवु ना तुमचंच नाव बाळाला... ? तुमची परवानगी हवीय... !'
म्हटलं, 'येड्या, परवानगी कसली मागतोस, माझा बाप झालास की रे आज... बाप परवानगी मागत नाही... !
तो माझ्या पायाशी झुकला... !
आणि मी, नव्यानंच मला जन्म देणाऱ्या माझ्या आईबापाच्या पायाशी नतमस्तक झालो... !
20.6.20
*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट, पुणे*
*abhisoham17@gmail.com*
*www.sohamtrust.com*
*Facebook : SOHAM TRUST*
Comments
Post a Comment