उदगिरीचा वाघ.... India on Wheel (Travel Stories 1)
रात्री ९.३० ते १० च्या आसपास किर्र झाडीतून वाट काढत मी चांदोलीच्या जंगलातुन मंदिराकडे चाललो होतो. जंगलातली झाडी इतकी गर्द आणि दाट होती की दाट हिरव्या गवतातून काळा कुट्ट साप सळसळत निघाला आहे असा डाबरी रस्ता होता. मधुनच घुबडाची आरोळी, रातकिडयांच्या किरकिरीला तडका देत होती.
पहाटे पहाटे ३ वाजता पुजाऱ्याने अभिषेकासाठी आलेल्या भाविकाला आवाज द्यायला सुरुवात केली तेंव्हा कळले की हे लोक सर्व तयारी करून दैनंदिन देव पुजा आटोपून भाविकांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पुजा अर्चा करत आहेत.
६ वाजेपर्यंत माझे प्रातःविधी आटोपुन देवींची आरती ऐकत ऐकत चहापान केले आणि इकडे तिकडे फिरत होतो. ८ वाजेपर्यंत सर्व फिरून फिरून पुन्हा गाडीत बसलो आणि पलंबरची वाट बघत कधी डुलकी लागली कळलेच नाही.
साधारण ९ वाजता गाडीला कोणतेतरी जनावर घासत आहे असे वाटले. गाडी बऱ्यापैकी म्हणजे जानवण्याइतकी अजून व्यवस्थित सांगायचे झाले तर PK मधील डान्सिंग कार प्रमाणे हलत होती. सुरुवातीला झोपेत असल्यामुळे दुर्लक्ष केले मात्र बराच वेळ परिस्थिती मध्ये बदल झाला नाही म्हणून उटून पाहायचा प्रयत्न केला पण.....
माझी झोपेच्या स्थितीत असणारी मान स्थिती बदलायला तयार नव्हती, डोळे टॉम प्रमाणे पापण्या ओडूनही डोळे उघडत नव्हते, मेंदू बॉडीला उचलण्याचे आदेश देऊन देऊन थकला होता. सर्व शरीर प्यारालायज्ड झाले होते. आता कळून चुकले की ती एनर्जी/ शक्ती/ ताकत पुन्हा एकदा भेटायला आली होती. आणि नेहमीप्रमाणे कोणताही अंदाज लागू न देता निघून गेली होती.
१० वाजता प्लंबर आला त्याने साहित्याची यादी काढून दिली. महाशय येताना ४० किमी अंतर प्रवास करून फक्त काम काय करायचे हे पाहण्यासाठी आले होते. त्याचेही बरोबर होते, काय काम करायचे हे पाहिल्याशिवाय तो तरी कोणते साहित्य घेवून येणार होता. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक नियोजन झालेवर आम्ही मुळ पाण्याच्या स्त्रोताकडे निघालो. आजच्या दिवसात फक्त पाहणी होणार होती हेच समजले.
मुळ स्त्रोत पाहायचा म्हणजे आपल्याकडे नेहमी पाहतो त्याप्रमाणे झरा किंवा नदी किंवा विहीर असेल अश्या समजात मी होतो. मंदिरातील एकाची गाडी विष्णूने घेतली होती. पाणी साठवण्याची जागा पाहून झाली होती मात्र विष्णू देव काही केल्या गाडी घेऊन आला नाही, नुसताच चावी घेवून माझ्या अवती - भवती फिरत होता. कळत नव्हते कसे सांगायचे. मी गाडी घेवून या म्हणायचो आणि तो गाडी आणलीय म्हणायचं.
आता मी पण म्हणालो, ' करा गाडी चालू निघुयात ' तेंव्हा विष्णू देव बोलले की मला वाहन चालवता येत नाही, ही चावी घ्या आणि मला घेवून मार्गस्थ व्हा. मग मला कळले की गाडीची चावी आली म्हणजे गाडी आली असे पण असते.
जंगलात वाट काढत साधारण १-२ किमी अंतर गाडी चालल्यानंतर झाडांच्या जाळीतून वाट निघायची बंद झाली तेंव्हा आम्ही गाडी तिथेच सोडून पायी जाण्याचे ठरवले. साधारण १५ मिनिटे चालल्यानंतर विष्णूने जोरजोरात ओरडायला आणि हाका द्यायला सुरुवात केली. प्लंबर आणि त्याच्या सोबतचा मुलगा चांगलेच घाबरले होते ते पाहिले आणि विष्णूला शांत बसायला सांगितलं. विष्णू शांत झाला आणि बोलला, ' मी शांत झालो तर काही फरक नाही पडणार... गवा आला तर कुठे जायचे मला माहीत आहे, तुम्ही लोक काय करणार '. हे ऐकले तेंव्हा लहानपणी जंगलातल्या पाणवठ्यावर आधारित वेगवेगळ्या कथा ऐकल्या होत्या त्या सर्व एका क्षणात नजरेसमोरून सर्रकन गेल्या. मग मात्र आमच्या मध्ये भयाण जंगल शांतता पसरली आणि एका मागून एक आम्ही विष्णूच्या मागे जंगलातली पालापाचोळा पडलेली पायवाट तुडवत पुढे चालू लागलो.
वर चढत असताना या भर उन्हाळ्यात चिखल दिसला आणि समजलो की अजून पाणी वाहते आहे. थोडे वर गेल्यावर पाहिले फॉरेस्ट विभागाने प्राणी गणना करण्यासाठी मचान केले होते. विष्णूने ते मचानाकडे बोट दाखवले आणि म्हणाला, पाहा काय पाहायचे आहे ते... बऱ्यापैकी दगड गोट्यांच्या मध्ये चिखल युक्त पाण्याचा अंश दिसून आला. आम्ही बराच वेळ मचाणावर बसून पाहिले आणि एक मातीचा छोटा बांध आणि त्याच्या खालोखाल सायपन पद्धतीने पाणी साठवण आणि वहन नियोजन केले आणि निघालो.
प्लंबर ने बऱ्यापैकी सर्व साहित्याची यादी बनवली होती. उद्या साहित्य घेवून तो येईल आणि शक्य झाल्यात कामाची पूर्तता करेल अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही परस्पर विरोधी दिशेने गाडी सुरू केली.
क्रमशः
Comments
Post a Comment