जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 2)
उदगिरीमध्ये भाविकांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली. त्यासोबतच अद्वितीय शक्तीचा अनुभव घेवून मी पुढील प्रवासाला निघालो. आतापर्यंत जवळपास सर्व मोह, माया, राग, द्वेष संपला होता. मुळातच माझी पेशन्स पातळी खुप जास्त आहे. परंतु एक तोटा पण आहे. सहन करून वाढलेली शक्ती तितक्याच ताकतीने बाहेर पडते. बरेच वेळेस असा रोष समोरचा व्यक्ती सहन करतोच असे नाही.
बाहेर पडताना जवळपास दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू सोबत ठेवल्या होत्या. त्यामध्ये वाचनासाठी पुस्तके, झोपण्यासाठी अंथरूण पांघरूण, तसेच सर्व डिजिटल गोष्टी सोबत होत्याच. कॉम्प्युटर, कॅमेरा, मोबाईल, सर्व प्रकारचे चार्जर, तसेच या सर्व गोष्टींना पर्यायी व्यवस्थाही सोबत घेतली होती.
उदगिरी मधून खाली पायथ्याला कोकरुड मध्ये आल्यानंतर देणगीदारांचे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचे पेयमेंट करेपर्यंत 4 वाजून गेले होते. रात्रीचा मुक्काम करण्याचे ठिकाण शोधताना जोतिबा समोरच दिसला. म्हणालो की आलोच आहोत तर कुलदैवत जोतिबाचा आशीर्वाद घेवून जावे. जवळपास 7 च्या आसपास मी डोंगरावर पोहचलो.
जोतिबाच्या डोंगरावर पार्किंग मध्ये गाडी पार्क करून भाजीपाला घेवून आलो. हा माझ्या प्रवासातील पाहिला स्वतः केलेला आणि स्वतःसाठी केलेला स्वयंपाक होता. क्लिओपात्राच्या रेशमी सहवासात मला जवळपास स्वयंपाक म्हणजे काय आणि चव कशाला म्हणतात याचा अंदाज आला होता. ज्यावेळी गाडी पार्क केली तेंव्हा बऱ्यापैकी लोकांची आणि वाहनांची वर्दळ होती. भाजीपाला घेवून परतताना रात्रीच्या अंधारात गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याचे जाणवले. कारण स्वयंपाक होईपर्यंत 11 वाजून गेले होते आणि वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीचा आतापर्यंत गजबजलेला चेकनाका ओस पडला होता. बॅरिगेट्स पण झोपले होते. दिवसभर वाहनांची धक्काबुक्की, कर्णकर्कश हॉर्न, इंजिनचे आवाज, तऱ्हेवाईक माणसांचे चेहरे आणि संवाद यातुन आताकुठे त्यांनापण उसंत मिळाली होती. सध्यातर मला त्यांचीच सोबत होती. त्यातील 3-4 जनांना गाडीच्या भोवती निद्रिस्त पहरेदारी द्यायला सांगून मी भात आमटी खावून गाडीच्या मागच्या सीटवर मस्त पहुडलो. रात्री उशिरापर्यंत मी जागाच होतो, कळत नव्हते की जे करतोय ते योग्य की अयोग्य.
जोतिबा जवळ पहिल्यांदाच गाडीत झोपलो होतो. आतापर्यंत गाडीत झोपायचा योग आलेला पण जेंव्हा प्रवासाचा अंत माहीत नसतो तेंव्हा गाडीत झोपण्याचा माझा पहिलाच अनुभव. जोतिबाच्या डोंगरावर थंड हवा जरा जास्तच आहे. काच उघडली की गार लागायचे आणि बंद केली की गरम व्हायचे. अर्धामुर्दा इकडे तिकडे होत गाडीच्या मागच्या सीटवर कधी झोप लागली कळलेच नाही. डोंगरावरच्या गायींना पण माझ्या गाडीच्या बाजुला आडोसा मिळाला होता.
सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्याचा आणि जागेचा प्रश्न मला आजही सतावतो आहे. तेंव्हा म्हणजे सुरुवातीला समजत नव्हते की प्रातःविधी कुठे करायचा ? कसा करायचा ? खुप जास्त प्रॉब्लेम होते. इथे जोतिबाच्या डोंगरावर पाण्याची टाकी बाजूलाच होती. पण जोतिबाचा डोंगर इतका स्वच्छ आणि नीटनेटका होता की उघड्यावरचा तर विषयच नव्हता. कसाबसा सुलभ आणि पाण्याच्या टाकीच्या सहाय्याने आजच्या दिवसासाठी सज्ज झालो.
जोतिबा जवळ आतापर्यंत बरेच वेळा बऱ्याच गोष्टी मागितल्या होत्या आणि हे मागणे म्हणजे पोराने बापाकडे मागितल्यासारखे आहे, ते काय संपणारे आहे का? पण आज देवासमोर उभा राहताना बरेच चलबिचल सुरू झाली होती. कारण पण तसेच आहे, समाजात सर्व व्यक्ती सर्व गोष्टींचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावत असतात, त्यात काही गैर नाही पण जेंव्हा समोरचा व्यक्ती या तर्काच्या पलीकडे गेलेला असेल आणि काही घडण्यापुर्वीच पूर्वकल्पना देत असेल आणि तरीही तुम्ही सोयीस्करपणे नारळ तथा खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता तेंव्हा बापाकडे काय मागायचे आणि काय सांगायचे याचा प्रश्न तर पडणारच ना. शिवाय व्यथा कोणाला सांगता येत नव्हती. शेवटी कोणाची तक्रार कोणाकडे करायची हा मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा होता. देवाच्या घराला उंबरा नाही हे माहीत होते पण आता अनुभवायला सुरुवात केली होती.
राशीचा विचार करावा तर शुक्र माझ्या पहिल्या घरात आहे आणि मी मात्र प्रेमाचा भुकेला असाच राहणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात जेंव्हा मागे वळून पाहिले तेंव्हा कळले की कोणीच सोबत नाही मग जर जीवन क्षणभंगुर असेल आणि कशाची शाश्वती नसेल तर का या मोहपाषात राहायचे. असो, आता तर सुरुवात झालीय आणि इतक्यात विचलित होऊन चालणार नाही. मस्तपैकी हुडी टाकून मी निघालो दर्शनासाठी....
साऱ्या मुलखाची थंडी इथेच पडलीय की काय, हुडीच्या आतमध्ये मला हुडहुडी भरली होती. मजल दरमजल करत मागच्या दक्षिण दरवाज्याने मी मंदिर परिसराकडे जायला निघालो. तसे मी 3-4 जोड चप्पल, स्लीपर, स्निकर, शुज सोबत ठेवले होते. थोडेसे चालणे आणि मंदिरात दर्शन घ्यायचे असल्याने मी स्लीपर घालून निघालो होतो. अजून रात्र सरली नव्हती 4 च्या सुमारास कुठेतरी म्हातारी खाकरल्याचा आवाज, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, डोंगराच्या कडांवरून वर येणाऱ्या वाऱ्याचा आवाज वगळता किर्रर शांतता पसरली होती. त्यामध्ये माझ्या पावलांचा आवाज शांतता भंग करत होता.
दक्षिण दरवाजा जवळ येताना डोंगर उतरून खाली जावे लागते. जसे मी डोंगर उताराला लागलो तसे थंड वारे, त्यासोबत गर्द धुके, दोन पावलांच्या पलीकडे दिसायला जागा नव्हती. दाट धुक्यामध्ये आता मंदिराच्या शिखरावरचा दिवा लुकलुकताना दिसू लागला होता. जवळ जाईल तसे नगारा ऐकू येऊ लागला. खुप साऱ्या गाड्या मंदिराच्या परिसरात उभ्या केलेल्या दिसल्या. भाविक आपापल्या पुजाऱ्यांकडे वस्तीला गेले होते. सर्व देवदेवतांचे दर्शन घेवून जोतिबाच्या समोर गर्भगृहात येवून मी थांबलो. माझ्या अगोदर बरेचसे भाविक देवांच्या पूजेची तयारी करत होते. त्यांचे पुजारी पुजा मांडत होते. मी पण संपुर्ण पुजा आणि आरती संपेपर्यंत देवाच्या गाभाऱ्यात माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधत होतो.
Comments
Post a Comment