कोलाहल - महेश बोरगे
दडपण, मानसिक तणाव आणि खुप काही .... चेहऱ्यावरील उसने हसू मग दुनियेतल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. जगातील सर्व दुःखाचे मूळ ही अपेक्षा आहे. जेंव्हा जेंव्हा अपेक्षाचा भंग होतो मानवी मनाचा कोलाहल वाढायला सुरुवात होते. कसे बाहेर पडायचे?????
---- महेश बोरगे.
कोणी विचारणारे नसावे... कोणी ओळखणारे नसावे.... फक्त मी आणि मीच.... आयुष्याच्या गडबडीत मी स्वतःलाच विसरलो आहे. कोपऱ्यावरील पांडूच्या टपरीवर कट्ट्यावर बसुन चहा पिण्यासाठी देखील विचार करावा लागतो, कोणी पाहिलं तर....
निसर्गाने सर्व गोष्टी व्यवस्थित दिल्या आणि आपण मात्र अधिक सुख-सुविधा मिळवायच्या नादात दिवसेंदिवस अधिकाधिक दुखी आणि व्यस्त होतोय.
दुधाचे बिल, लाईटचे बिल, पेपरवाला, प्लंबर, खुप सारे..... सकाळी उठल्यापासुन लगबग सुरु. मग अश्या वेळी काय होईल. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस.... वर्षनुवर्षे तुम्ही मी सगळे घाण्याच्या बैलासारखे फिरत आहोत आणि पुढेही असेच राहील. यात लगेच काही बदल होईल असे वाटत नाही.
खुप खुप करून झाले आणि अश्या गोष्टींची उबग आली तर...........???????
आयुष्य कसे असावे, कोकणातल्या वाहत्या आणि खळाळत्या नदीसारखे, स्वच्छ सुंदर आणि शीतल. दररोज मला कोणी बॉस नसेल, कोणते टार्गेट नसेल, क्लायंट नसेल ना शटलची धक्काबुक्की...... किती छान न..... कल्पना खुप चांगली आहे, कारण हे फक्त कल्पनेतच होऊ शकते. नाहीतर सकाळी घरातुन बाहेर पडलो कि कुठे जायचे हे ठरवुन मग बसची वाट पहा नंतर कंडक्टरची टिकटिक.... चला, नवीन येणारे तिकीट घ्या... तिकीट घ्यायचे कोणी राहिलेय का??? आणि मग बसच्या टपावर दिलेले 2-3 दणके.... उश्श्श..........
पण असे झालेतर कि एक दिवस तुम्ही सकाळी उठून फ्रेश झालात आणि निघालात.... येणारी बस पकडायची, मनात येईल तिथेपर्यंत जायचे आणि मग उतरून मनसोक्त हुंदडायचे... फिरायचे... खायचे... प्यायचे.... मस्त मजा करायची आणि पुन्हा पहिल्यांदा येणारी नवीन बस पकडायची.... कोणी विचारणारे नसावे... कोणी ओळखणारे नसावे.... फक्त मी आणि मीच....
मलाही अगदी असेच आवडते. कुठे जायचे माहित नाही, कधी पोहोचणार माहित नाही, का जायचे माहित नाही, फक्त येणाऱ्या बसमध्ये बसायचे आणि निघायचे.... वाहत्या आणि खळाळत्या नदीसारखे....
आपले आयुष्य जगताना पण असेच असते, आपण आयुष्याचे ध्येय ठरवतो, मग त्यासाठी सुंदर सुंदर नियोजन करतो आणि नियतीबरोबर चालायला / वाहायला सुरुवात करतो. पण बॉस नावाचा प्राणी, नवरा / बायकोच्या आशा-आकांक्षा, नातेवाईकांचे अहंभाव, शेजाऱ्याचा जळफळाट असे कित्येक गोष्टी असतात आपल्या वाहत्या पाण्याला बांध घालुन साठवण्याचा प्रयत्न करतात मग आपसुकच वाहत्या आणि खळाळत्या नदीचे स्वच्छ सुंदर आणि शीतल पाणी साठलेले, शेवाळाने भरलेले मग हळूहळू कमी होणारे असे डोह बनते.... ज्याचा कोणाला अंदाज नाही येऊ शकत.
मग दडपण, मानसिक तणाव आणि खुप काही .... चेहऱ्यावरील उसने हसू मग दुनियेतल्या सर्व चेहऱ्यावर दिसू लागते. याच्या पाठीमागे आहे ती फक्त अपेक्षा, आपण इतरांकडून ठेवलेली आणि इतरांनी आपल्याकडून ठेवलेली. जगातील सर्व दुःखाचे मूळ ही अपेक्षा आहे. जेंव्हा जेंव्हा अपेक्षाचा भंग होतो मानवी मनाचा कोलाहल वाढायला सुरुवात होते.
स्वतःला अवास्तव दिलेला अहंभाव हा देखील सामाजिक कलहाचा जनक आहे. तेंव्हा सगळे विसरून काही काळासाठी पडा बाहेर, मुक्त जगा, बिनधास्त रहा, आयुष्य खुप सुंदर आहे.
Comments
Post a Comment