"स्वत्वपरीक्षा - महेश बोरगे
स्त्री नेहमी जग जिंकायची ताकत बाळगते पण ज्यांच्यासाठी कष्ट करायचे, राबायचे, हाडाची काडे करायची त्यांना याची तसुभर चिंता नसते. जेंव्हा समाज बघ्याची भूमिका घेतो आणि "समाज काय म्हणेल" या तीन शब्दावर आयुष्य फिरायला सुरुवात होते तेंव्हा संघर्षशक्ती पणाला लागते. त्यातूनही स्त्री अशी ताकत आहे कि ती जगाला दिशा देऊ शकते पण स्वाभाविक प्रेमळ, हळवी असणारी स्त्री फक्त हृदयातुन विचार करते त्यामुळे परिस्थिती चिघळत जाते. मेंदूने विचार केली तरच अश्या परिस्थितीतून बाहेर पडू शकते. या परिस्थितीत स्त्रियांनी खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करायला सज्ज व्हायला पाहिजे. सज्ज होणे म्हणजे युद्ध पुकारणे असे नाही.
अगदी लहानपणापासुन शब्दांचा मारा करून करून मुलींची उमेद कमी करायचे काम पालक करीत असतात. कितीही कर्तुत्व सिद्ध केले... चांगली नोकरी अथवा उद्योग जरी उभा केला तरी मुलगी वस्तू असल्यासारखी दाखवली जाते. पालकांच्या भाबड्या आश्या, लहानपणापासुन केलेला शब्दांचा मारा यातुन आजच्या जमान्यातील मुलींच्या मनातही मी स्वतंत्र आहे, मी सर्वकाही करू शकते या विचारासोबत माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी असे केले पाहिजे तसे केले पाहिजे असे म्हणत म्हणत स्वतःला केंव्हा समर्पित केलेले असते हे त्यांनाही माहित नसते. मला मान्य आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे आणि सहजासहजी यामध्ये बदल होणार नाही. "कि आणि का" मुव्ही पहिला तेंव्हा हे फक्त सिनेमात होत असते असे कमेंट पास करणाऱ्या माझ्या मैत्रिणी IT मधील नामांकित कंपनीत काम करणाऱ्या आणि स्वतःला आधुनिक जगाच्या प्रतिनिधी समजणाऱ्या पैकी होत्या हे विशेष...
मुलींना आजच्या घडीला काय अपेक्षित आहे हे विचारले तर त्यांचे अंतिम ध्येय पुन्हा सेटलमेंट वर येते आणि थांबते. पण जेंव्हा याच मुली मोहजाळात अडकतात किंवा पालकांकडून "समाज काय म्हणेल" या तत्त्वाखाली मोहजाळात अडकवल्या जात्यात तेंव्हा परिस्थिती अशी बनते कि एका बाजूला आग असते आणि एका बाजुला विस्तव.... काहीही निवडले तरी नशिबी जळणे आहेच. जेंव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते. सासर जरी श्रीमंत नसले तरी सुरुवातीला दाखवायला तरी श्रीमंत असतेच. ज्याला आयुष्याचा सोबती म्हणून स्वतः निवडलेले असते किंवा आईबापांनी तो लाडाचा मुलगा ज्याला थोडी बहुत कमवायची अक्कल असते म्हणायला असते. तरीही मुली आई बापाच्या सुखासाठी आणि "समाज काय म्हणेल" या तत्त्वाखाली संसार सुरु करते. एक दोन मुले झाली कि जबाबदारी वास्तव चित्र पुढे करू लागते.
स्वतःचे स्वप्न कधीच मागे पडलेले असते आता त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या पाठीमागे ती लागलेली असते. आई वडील भाऊ सासू सासरे मुले सगळ्यांची मन सांभालण्यात तिचं आयुष्य हळुहळू सरायला सुरु झालेले असते. पण तिच्यासाठी कोणाच्याहि मनात प्रेम नसत. फक्त एक घरातील काम करणारी मोलकरीण, मुलांचा सांभाळ करणारी एक बाई. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारी एक मशीन असते. आणि असे बनण्यामागे ती स्वतः कारणीभुत आहे. तिच्या मनाचा कोणी विचार तर करत नाहीच याउलट तिला गृहीत धरायला सुरुवात होते. तरीही ती जगत असते. हळुहळू तिची जागा एका गृहिणीने घेतलेली असते जिला करिअरपेक्षा मुलांची जडणघडण महत्वाची झालेली असते. कळत न कळत अपेक्षा बाळसे धरायला सुरु करतात. जसजशी मुले वाढायला सुरुवात होते तसतश्या तिच्या अपेक्षा वाढायला सुरुवात होते. यात मुलींचा / स्त्रियांचा काहीच दोष नाही. आपली जपणूक आणि शारीरिक, मानसिक वाढ याच आणि अश्याच प्रकारच्या वातावरणात झालेली असते.
कधीतरी आपल्या मुलांना आपण कळेल ? सासू सासर्यांना कळेल?? आईवडिलांना कळेल ??? नवऱ्याला कळेल ????? असे म्हणत स्त्री दिवस काढत असते. पण स्त्रीला उद्या कधीच उजाडत नसतो हे माहित नसते. अश्या परिस्थितीत अवकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रगत नव्या पिढीला अडजस्टमेंट करणारी आई कमकुवत वाटू लागते.. मागासलेली वाटू लागते मग पुन्हा आईवडिलांना खुश ठेवण्यासाठी पाल्यांकडून गृहीत धरणे चालु होते. या काळात संवाद पुर्णपणे मरून त्याची जागा सांगाव्याने केंव्हा घेतलेली असते हे कोणालाच कळलेले नसते आणि जेंव्हा कळते तेंव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. आज मुलांना आपले आईवडील जे सांगतात ते पटत नाही किंवा मुले सर्व ऐकून घेतात पण करताना जे स्वतःला पाहिजे तेच करतात. त्यांना स्वतःला जगायचं आहे तसेच जगतात. आणि या ठिकाणी पूर्वीचे पाल्य आता पालकांच्या स्वरुपात उभे ठाकलेले असतात.
अपेक्षा कमी आणि अनुभव जास्त दिले तर मुलांना वेळीच शहाणपण येईल. काय परिस्थितीमध्ये जपणूक केली आणि कसे वाढविले हे ऐकून घेणारी पिढी शिल्लक नाही. जेंव्हापासून विभक्त कुटुंबपद्धत लागू झाली तेंव्हापासून माणुसकी संपुष्ठात आली म्हणायला हरकत नाही. मुलांना काहीही कारण काढून समाज दाखवा म्हणजे मुलांची मानुसकी वाढीला लागेल. माझे बाळ बाळ म्हणत बनण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर जबाबदारी घ्यायला शिकवा मग ती मुलगी असो वा मुलगा. पालक म्हणुन मुलांवर बारीक लक्ष द्या पण त्यांच्या कामात (क्षुल्लक जरी असले तरी) अजिबात पालकगिरी दाखवू नका. त्यांना अडचणी येवू देत.. छोट्या छोट्या अडचणी सोडवू देत... या काळात माझं बाळ कसे अडचणी सोडविते म्हणुन कुरवाळून शेफारू देऊ नका. जर असे केलेत तर हेच बाळ खांद्यावर बसुन कानात .... करेल. तेंव्हा वरून खाली फेकण्यापेक्षा जाणीवपूर्वक आणि जबाबदारी पुर्वक वाढवा.
___ महेश बोरगे
(maheshborge@gmail.com)
Comments
Post a Comment