घुसमट - महेश बोरगे
जीवनात नाती जपताना तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्पर्धेच्या युगात स्थळ, वेळ आणि परिस्थिती नुसार मानवी स्वभावाचे पैलू नजरेस अनुभवास येतात. म्हणजे जो व्यक्ती कार्यालयीन वेळेनंतर जितका पोरकट वाटतो तोच व्यक्ती कार्यालयात इतका प्रगल्भ बनतो की जणू काही दुसरा न्यूटनच.… असो, मला इतकेच म्हणायचे आहे की आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावविषयी कोणतेही गृहीतक लागू होत नाही. महान पंडित (?) म्हणतात की चेहरा पाहिला की स्वभाव सांगू शकतो पण आज घडीला सुपर कॉम्प्युटर देखील अपयशी ठरतील इतके मानवी स्वभावात चढ उतार जाणवतात. कोण केंव्हा कसा प्रतिक्रिया देईल याचा अंदाज बांधणे शक्य नाही.
खाजगी आयुष्यातील क्षणांना देखील आज स्पर्धेच्या युगात जागा मिळणे कठीण झालेय. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक या सर्वांनाच वेळचे नियोजन करता करता नाकीनऊ येत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने सर्वांची जपणूक करण्याचा प्रयत्न करत असतो पण दिवसेंदिवस घुसमट वाढत जाते आणि अंतिम टप्प्यात तो किंवा ती खूप गर्विष्ठ आहे असे म्हणून बाकीचे बोट दाखवून रिकामे होत आहेत.
इतक्या धकाधकीच्या जीवनात ग्रामीण आणि शहरी भागातील दरी वाढण्याचे कारणही हेच आहे. शहरात जीवनाचा वेग वाढला आहे मात्र ग्रामीण भागात अजूनही ठराविक गतिविधी सोडल्या तर सर्व घटकांचा दिनक्रम सारखा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील समाजातील सदस्यांना शहरी दिनक्रम आव आणल्यासारखा वाटतो.
सर्वांना जास्तीत जास्त वेळ देता यावा, नातेवाईक, मित्र, कुटुंबीय यांच्याशी किमान प्रासंगिक औपचारिकता दाखवता यावी म्हणून 'वेळ घेऊन या किंवा अगोदर फोन करून मग या' असे सांगितले जाते तेंव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की किती गर्विष्ठ आहे. यामध्ये प्रामुख्याने वेळेचे नियोजन करावे या हेतूने बोलले जाते मात्र अर्थ वेगळा काढला जातो. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, जवळची नाती तुटायला ही परिस्थिती कारणीभूत ठरते.
'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' या उक्तीप्रमाणे फक्त अंदाज न बांधता समोरच्या व्यक्तीला समजून घेणे आवश्यक आहे. त्याचे कामाचे स्वरूप, कामाचा व्याप, कामाचे तास, कामाचा ताण यानुसार समरस होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने जर स्वतःच्या कामावरून किंवा परिस्थितीवरून इतरांना गृहीत धरले तर तणाव वाढत जातील आणि शेवटी प्रत्येकजण एका चांगल्या नात्याला गमावून बसणार आहोत.
सर्वांना त्यांची स्वतंत्र अस्तित्व टिकवून जागा द्या. प्रत्यक्षात बोलता आले नाही तर किमान फोनवर बोला. तेही शक्य झाले नाही तर वास्तविक सामाजिक व्यासपीठावरून (फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर या सारख्या) स्वतःच्या नातेवाईकांना, मित्रांना, कुटूंबियांना जवळ ठेवा. कठीण प्रसंगी फक्त संकेतस्थळावरील मैत्री उपयोगाला येत नाही, प्रत्यक्षात असलेले नातेसंबंध उपयोगाला येतात. लहानपणापासून एकत्र वेळ घालविलेले आता आभासी दुनियेत एकत्र भेटले तरी पुष्कळ आहेत. संपर्कात रहा, खुषाली विचारा, सांगा, तब्बेतीबाबत बोला, गावाबाबत बोला, नवीन उपक्रमाबाबत बोला पण बोला मग त्यासाठी मार्ग कोणताही असो. बोलल्याने मन मोकळे आणि प्रसन्न होते.
____महेश बोरगे, पुणे
(maheshborge@gmail.com)
Comments
Post a Comment