आगमन गणरायाचे... - महेश बोरगे

गेली 3 ते 4 दिवसांपासून मला माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य राहिले नाही. इतकी गडबड आणि थ्रिल कधीच अनुभवले नाही. मी प्रत्येक दिवशी काही न काही एक नवीन अनुभव गाठीला बांधत असतो. या चार दिवसांत मात्र माझे आयुष्य कोणीतरी दुसराच चालवतोय आणि मी यंत्रासारखा फक्त चालवला जातोय असा भास होऊ लागला आहे. त्यातून गणपतींचे आगमन आणि या घटना याचे लागेबांधे असावे असे वाटू लागले.

अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाले तर मी आणि माझा मित्र बराच प्रवास केल्यामुळे दमून सावळज मध्ये प्रवेश केला. अगदी सुरुवातीलाच भव्य गणपतीचा स्टॉल लावलेला दिसला. मित्राने त्याच्याकडे गणपती नोंदवला आणि त्याची ती नोंदणी चालू होती तोपर्यंत विक्रेत्याशी माझी चर्चा सुरू झाली. इकडचे तिकडचे बोलताना समजले तो कार्यकर्ता माझीशेतीचा फॅन आहे. आता सावळज म्हणले की आपसुकच शेतकरी वर्गातून माझीशेतीची विचारणा होतेय. 

मी त्याला जाणीवपूर्वक माझी ओळख सांगितली नाही. (खरंतर कार्यक्रम सोडून इतर वेळी मला कोणी पाहिले तर त्याचा विश्वासच बसणार नाही की मी माझीशेतीसाठी काम करत असेन, कारण मुलांच्यात मुलगा बनून आणि मोठ्यांच्यात मोठा बनून रहायचं कसब अंगी भिनले आहे) दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे 10-11 वाजता उठून फ्रेश होऊन गणपती खरेदीला गावात गेलो तर मला कुठेही गणपती भेटले नाहीत, सर्व ठिकाणचे गणपती अगोदरच बुक झाले होते. कसाबसा एक ठिकाणी मनाला समजवत एक गणपती निवड केली मात्र ती मूर्ती दुखावली असल्याने मला नाईलाजाने परत द्यावी लागली. 

आता दुपारचे 3 वाजले होते आणि 99% मूर्ती संपल्या होत्या. मला कळत नव्हते असे का होतेय... एक ठिकाणी 7 ते 8 मुर्ती शिल्लक होत्या पण त्या सर्व मोठ्या होत्या आणि माझ्या कुवतीच्या बाहेरील होत्या म्हणून हजार दीड हजाराच्या मूर्ती मी फक्त किंमत विचारून परत निघालो. घरी काय सांगायचे कळत नव्हते म्हणून मंडळाच्या मुर्तीजवळ थांबून तिथे थोडावेळ सहकार्य करत होतो. पण शेवटी मनातील वादळ काही केल्या थांबेना मग शेवटी विचार केला आणि गणपतीला काळजी असेल तर होईल काहीतरी असे म्हणून पुन्हा त्या दुकानात गेलो. 

आता 4 वाजून गेले होते. गेल्या गेल्या पाहिले तर फक्त 4 मुर्ती शिल्लक राहिल्या होत्या. पुन्हा पुन्हा कसे बोलायचे विचार करत मी त्याला विचारनार इतक्यात तो बोलले.... तुम्हाला काय द्यायचे ते द्या आणि घेऊन जा. मुर्तीवरचा 4 अंकी आकडा पाहून काही रक्कम सांगायचे माझे धाडसच होईना. बराच वेळ मी एक नजर मुर्तीकडे आणि एक नजर विक्रेत्याकडे पाहत होतो. शेवटी त्याला म्हणालो, माझ्याकडे फक्त 500 रुपये आहेत आणि ते मी गणपतीसाठी ठेवले आहेत. तो म्हणाला ठीक आहे... 

माझा तर विश्वासच बसला नाही, 3 ते 4 पट किंमत कमी केली??? मला त्याची खरेदी किंमत जाणून घ्यायची नाही आणि मी भविष्यात कधीही विचारणार नाही हे नक्की केले आणि पुन्हा एकदा त्या मुर्तीकडे पाहिले, जी मुर्ती एकट्याला घेऊन जाता येत नाही ती मला भेटली होती. खरचं गणपती बाप्पा घरी येणार असेल तर काहीही होऊ दे सगळ्या अडचणी सुटण्याचे आणि सोडवण्याचे मार्ग घेऊन येतात ते... त्याच्या प्रत्ययाची ही सुरुवात झाली असावी.

!!!!! गणपती बाप्पा मोरया !!!!!

Comments

Popular posts from this blog

Corporates & CSR project implementation

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

WHAT WENT WRONG ???