जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 3)

 जोतिबाच्या गाभाऱ्यात मी शांतपणे बसून होतो. कुठे जायचे माहीत नाही, का आलोय माहिती नाही, कधी पर्यंत बसायचे माहीत नाही. बस, जोपर्यंत मन करते तोपर्यंत बसून राहायचे आणि मनाला वाटले की उठून जायचे. संसाराचे प्रश्न संताना सुटले नाहीत मग मी कोण बापडा.. 

आता जोतिबाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. सर्वांची गडबड चालली होती. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जोतिबाकडे गार्हाणे मांडून भाविक पुढच्या मार्गाला चालले होते. 8 च्या सुमारास गर्दी इतकी वाढली की मला नाईलाजास्तव उठावे लागले. इतक्या वेळात ना जोतिबाने मला काही सांगितले ना मी जोतिबाकडे काही मागितले. 

गुलालाने माखलेल्या पायऱ्या तुडवत तुडवत मी वर आलो. जोतिबाच्या डोंगरावर आता चांगलीच वर्दळ सुरू झाली होती. मी तसाच खाली आलो, यमाईच्या दर्शनाला कोणी आलेले दिसत नव्हते. यमाईचा शांत, निसर्गरम्य वातावरणात बस्स इथेच स्थायिक व्हावे असे वाटत होते. निसर्गाच्या सानिध्यात पिठाने भरलेल्या कट्ट्यावर निवांत बसलो होतो. बसल्या - बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. सुख नक्की काय असते ते मला इथे कळले. 

नुकतेच लग्न झालेल्या दांपत्याने मला झोपेतून जागे केले आणि विचारले, आम्हाला इथे चवड मांडायची आहे, तुम्ही आम्हाला सांगाल का ? कशी चवड लावायची. माझ्या लग्नानंतर मी चवड लावली होती की नाही मला आठवत नाही. पण शेवटी संस्कार, रूढी - परंपरा यांची चांगली जान असल्याने प्रत्येक एक दगड / चपटी सोबत काय मागायचे आणि कसे 7 जन्माचे सुखाची चवड लावायची सांगितले आणि फ्रेश होऊन गाडीकडे आलो. 

झाडांच्या गर्द सावलीत माझी काळी गाडी आणि तिच्या भोवती बसलेल्या गाई.. गाडी मला समजूनच अळी नाही. दुपारचे 12 - 1 वाजले तरी गाडीमध्ये बसूनच होतो. जेवण करायचा कंटाळा फार त्यामुळे हे करू का ते करू अश्या विचारात होतो तोपर्यंत मला सावळजचे शेजारी गरड मामा दिसले. त्यांनी पण चांगली गार सावली बघून गाडी लावली होती आणि मस्त ताणून दिली होती. आता त्यांना माझी चुलत बहीण दिली होती त्यामुळे ते आमच्या पुर्ण भावकीचे जावई पाहुणेच होते पण मी वयाने लहान होतो आणि गल्लीतली सर्वच लहान मुले त्यांना मामा म्हणायची म्हणून ते आमचे / माझे पण मामाच झाले. 

त्यांच्याकडे गेलो, इकडच्या - तिकडच्या, गावाकडच्या गप्पा मारत वेळ कसा गेला कळलेच नाही. शेवटी मामांनी घरून आणलेला जेवणाचा डबा काढला. तुम्हाला सांगतो, माझे घर, माझा गाव किंवा अजूनही तुमच्या गावाकडे बघा. संध्याकाळी 2 जणांचे अतिरिक्त जेवण तयार असते. डब्याला पण 1 जन एक्स्ट्रा जेवेल इतके जेवण नक्कीच असते. घरचे जेवण म्हणल्यावर मी पण मामांच्या डब्यावर ताव हाणला. दोघेपण मस्त जेवण केले आणि गाडीतच पुन्हा झोपून गेलो. मामांचे गाडीसाठी कॉल आल्यावर मामा म्हणाले, चल सोबतच निघूया. 

मी गरड मामांना सांगितले मी सध्या सर्व सोडून देशाटण करीत आहे. त्यांना काय बोलावे ते सुचेना, त्यांनी मला 3-4 वेळा फिरून फिरून विचारले, का आणि कश्यासाठी. माझे उत्तर एकच - मला माझ्या स्वतःला जाणून घ्यायचे आहे. संसारात काही नाही. रोजच तेच तेच करून कंटाळलो आहे. कुठे जाणार आहे, कसे जाणार आहे, काय करणार आहे, याची उत्तरे सध्यातरी माझ्याकडे नाहीत, पण लवकरच मी सांगेन तुम्हालाच नाही तर सर्वांना.. मी कोण आहे? आपण कोण आहे? कुठून आलो? कसे आलो ? का आलो? जीवन का व्यस्त आहे? कोणासाठी इतकी पळापळ? 

गरड मामांनी एकच वाक्य बोलले, 'महेश, गल्लीत किंवा गावात म्हण, तु लय शिकला आहेस. किसन देवांचा पोरगा आणि राणोजी महाराजांचा वारस आहेस. मी काय सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय करायचे हे तुला समजले पाहिजे. विनाकारण कोणत्याही गोष्टी होत नसतात. आत्मज्ञान हेच श्रेष्ठ ज्ञान समजून पाऊले टाक. तुला मार्ग दिसेल.' मामांनी गाडीचा स्टार्टर मारला आणि धुळीचा लोट उटवत मामांची गाडी नजरेआड होईपर्यंत मी रस्त्याकडे पाहत स्तब्ध उभा होतो. 

जोतिबा आमचा कुलदेव, त्याच्या जागेत असताना माझ्या घरचे कोणीतरी भेटावे आणि त्यांनी दिशा द्यावी हे विधिलिखित असावे समजून मी गाडीकडे निघालो. 

क्रमश: .. 

Comments

Popular posts from this blog

प्रयत्नांती परमेश्वर : यशाचे खरे सूत्र

क्रांती - महेश बोरगे