म्हातारा मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.
एक घर, दोन निर्णय: कर्तव्याची 'पेरणी'
अविनाश आणि सुहास हे दोन भाऊ शहरात स्थायिक झाले होते. अविनाश आणि सुहास दोघेपण बऱ्यापैकी चालणाऱ्या कंपनीत महत्त्वाच्या पदावर होते. दोघांच्याही आयुष्यात फ्लॅटचे कर्ज, गाडीचे कर्ज आणि मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज सुरूच होती.
सर्व सुरळीत सुरू असताना अचानक गावाहून फोन आला—त्यांच्या काकांचे निधन झाले होते. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. हे तेच काका होते ज्यांनी अविनाश आणि सुहासच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी घेऊन दोघांचे शिक्षण पूर्ण केले होते. घरची जबाबदारी घेतली होती. आज काकांच्या मृत्यूने दोघांच्याही डोक्यावरचा आधार निघाला होता.
अविनाश आणि सुहास दोघेपण जबाबदार पदावर होते, त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये रोज जबाबदारीने काम करावे लागायचे. आज नुकतेच ऑफिसमधून घरी आले, कसेबसे जेवण करून 10 वाजता उद्याच्या कामाचे नियोजन डोक्यात ठेवून नुकतेच बेडवर पडले होते इतक्यात गावावरून फोन आला, "काका गेले..."
आज ऑफिसमध्ये अविनाश आणि त्याच्या बॉसचे व्यवस्थित बोलणे झाले होते. बॉसने अविनाशला उद्याची डील फायनल करायला सांगितले होते. कंपनी नुकतीच कोरोनाच्या कचाट्यातून बाहेर पडायला मान बाहेर काढत होती. उद्याची डील जर नाही झाली तर अविनाश आणि त्याच्यासोबत त्याच्या संपुर्ण टीमचे भवितव्य धोक्यात येणार होते. डील फायनल होणार होती, जी अविनाशच्या करिअरसाठी 'करो वा मरो' अशी होती.
अविनाशने जड अंतःकरणाने निर्णय घेतला की, तो डील पूर्ण झाल्याशिवाय गावी जाणार नाही.
सुहास मात्र काकांच्या उपकाराची जाणीव ठेवून जसा आहे तसा उठला आणि गावी जाण्यासाठी गाडी काढली. सुहास सोबत त्याची आणि अविनाशची फॅमिली गावी गेली.
गावात सुहास पोहोचला. काकांच्या अंत्यविधीसाठी सुहासला पाहून गाववाले म्हणाले, "बघा, सुहासला म्हणतात पोरगा! सगळं काम सोडून बापाच्या जागा घेणाऱ्या काकासाठी धावून आला. रक्ताचं नातं जपलं त्याने."
पण त्याच वेळी अविनाशबद्दल चवीने चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागले, "अविनाश तर पार बदलला. पैसा मोठा झाला का काकापेक्षा? बाप असता तर असेच वागला असता का? या सर्वांच्या मध्ये अविनाशची बायको मात्र पूर्ण खचून गेली.
त्यांची सासू म्हणाली, "म्हातारा गेला तरी याला शहरातल्या साहेबाची चाकरी महत्त्वाची वाटली. असा मुलगा असून काय फायदा?" सर्वांनी सुहासला 'श्रावणबाळ' आले आणि अविनाशला 'नराधम' ठरवले. दुसऱ्या दिवशी अविनाश गावी आला मात्र गावातील सर्वांनी त्याला दूर लोटले. आतातर अविनाशची बायको पारचं खचली. तिने अविनाश सोबत बोलणे टाकले.
दोघेही गावी १३ दिवस थांबले, घरी काय हवे नको ते पाहिले. काकांचे सर्व विधी त्यांनी प्रेमाने केले. आणि पुन्हा १३ दिवसांनी मुंबईला कामावर परत आले.
आज 13 दिवसांनी दोघांच्याही ऑफिसमधील वातावरण बदलले होते. अविनाशचा प्रोजेक्ट मंजूर झाला होता. त्याच्या हाताखाली नवीन टीम आली होती, महत्त्वाचं या 13 दिवसात बॉसने स्वतः अविनाशचे काम केले.
पण सुहास जेव्हा ऑफिसला परतला, तेव्हा तिथले चित्र वेगळे होते. बॉस वैतागलेला होता. "सुहासने अचानक १३ दिवस रजा घेतल्यामुळे त्याच्या प्रोजेक्टचा खेळखंडोबा झाला. त्याचा प्रोजेक्ट दुसऱ्याकडे गेला. सुहासची टीम विखरली, सुहास बेंचवर गेला. सुहासच्या जागी दुसरा माणूस प्रोजेक्ट बघतोय," आता त्याला जास्त दिवस बेंचवर राहावे लागले तर.... सुहासची नोकरी धोक्यात आली होती आणि त्याच्यावर तर कर्जाचा भलामोठा डोंगर उभा राहिला आहे.
दुसरीकडे, अविनाशने ती डील यशस्वी केली. त्याला कामासाठी मोठी टीम मिळाली, प्रोजेक्टचा मोठे बोनस आणि प्रमोशन मिळाले. आता त्याच्याकडे भरपूर वेळ होता. त्याने गावी फोन करून काकांच्या मुलांना शिक्षणासाठी मुंबईला आणले. काकूला तर मदत केलीच पण त्यांच्या शेतात पण पाण्याची सोय करून भरभराट करून दिली. दोन वर्षात अविनाशने काकांच्या मागे त्यांचे कुटुंब खंबीरपणे सांभाळले. काकू आणि आईच्या भविष्यातील उपचारांची सोय केली.
इकडे सुहासचा जॉब गेला, कर्जाचा डोंगर, सुरुवातीला कसे तरी दिवस काढले.... आता मात्र परिस्थिती पुरते हाताबाहेर गेली होती. सुहासची बायको आणि सुहासच्या संसाराची आर्थिक वाताहत झाली होती.
दोन वर्षांनंतर, सुहास अजूनही नव्या नोकरीसाठी धडपडत होता. गाववाल्यांची 'शाबासकी' त्याच्या घराचा हप्ता भरू शकली नाही की त्याच्या मुलाची फी देऊ शकली नाही. अखेर त्याला मदतीसाठी कोणीच उभारले नाही.
वेळ आणि प्रसंगाचे गांभीर्य पाहून अविनाशने सुहासला मदत करताना फक्त इतकेच म्हटले, "सुहास, म्हातारा मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये." तेव्हा लोक तुला चांगलं बोलले आणि मला वाईट. पण जर मी सुद्धा तुझ्यासारखाच वागलो असतो, तर आज आपल्या घराची 'पेरणी' करपून गेली असती. दुःख बाजूला ठेवून मी तेव्हा माती जपली, म्हणून आज आपण सगळे सुखाची भाकरी खातोय."
सार:
भावनिक होऊन घेतलेला निर्णय समाजात 'वाहवा' मिळवून देतो, पण व्यवहार आणि भविष्याचा विचार करून घेतलेला कडू निर्णय संपूर्ण कुटुंबाला 'काळाच्या' (संकटाच्या) विळख्यातून वाचवतो.
Comments
Post a Comment